Face-off with bear at DodiTaal Trek: May.2017 by Prakash Kulkarni

स्वछंदच्या हिमालयातील दोडीताल trek दरम्यान १ मे २०१७ ला घडलेली थरारक घटना.

 - प्रकाश कुलकर्णी
 (स्वच्छंदी)

ब्रेकफास्ट करून आम्ही सर्वजण निघालो. सुरवातीपासून चढण होती, पण निसर्गरम्य जंगलाचा परिसर होता त्यामुळे सर्वजण उत्साहात होते.  चढ असूनही पावले भराभर पडत होती. तरूण मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या बरोबर आमचा गाईड कम लीडर होता. एकमेव रस्ता असल्याने, चुकण्याची शक्यता नव्हती.

सारे कसे all well चालले होते. मुक्कामाच्या ठिकाणाहून निघाल्या पासून दोन अडीच तास झाले असतील. काहीजण पुढे, काहीजण मागे तर काहीजण तात्पुरत्या थकव्याने थोडी विश्रांती घ्यावी म्हणून सावलीत बसले होते.

भरपूर चढ चालून आल्याने मी ६७ वर्षांचा अनुभवी खेळाडू जरा दमलो होतो पण मनाने उत्साहीत होतो. अशावेळी नेहमीच मला माझ्या अनुभवाचा सल्ला असतो कि "हळू का होईना" चालत राहायचे, म्हणजे रस्ता लवकर संपतो. असो.

मी, प्रप्द्मुम्न आणि आमचा गाईड प्रथमसिंग असे पुढे निघालो होतो. पुढे एका ठिकाणी प्रद्मुम्नपण म्हणाला काका, आपण जरा थांबून या.  माझी थांबण्याची ईच्छा नव्हती, म्हणून मी प्रथमसिंगला म्हटले "अगर मै आगे चलता राहू  और आप प्रद्मुम्नके साथ थोडी देरसे आए तो चलेगा क्या?" प्रथमने कहा "हां ठिक है".

मग मी हळू हळू चालायला लागलो. मला पक्षी निरिक्षणाची आवड असल्याने मी रमत गमत चालत होतो. साधारणपणे एक कि.मि. अंतरावर रस्ता (पाऊलवाट) डावीकडे वळत होता. त्याच्या २० फुट अलिकडे एक बोर्ड दिसला, त्यावर वेगवेगळ्या जंगली प्राण्यांची चित्रे होती व सावधानतेचा इशारा लिहिला होता. मी तो बोर्ड पहात असताना, मला उजव्या डोळ्याच्या कडेला काहीतरी हालचाल झाल्यासारखे वाटले, म्हणून मी तिकडे पाहिले. आणि ते दिसले...

मी पाहिले की एक पूर्ण वाढ झालेलं एक अस्वल माझ्या रस्त्यावर उभे आहे. माझी आणि त्या अस्वलाची नजरानजर होताच त्या अस्वलाने  मला ओरडून इशारा दिला. जणू धमकावलेच.

या पुर्वी, वासोटयाच्या जंगलात मोकाट अस्वलाची भेट झाली होती. पण ते अस्वल आकाराने लहान होते. आणि मला पाहताच पळून गेले होते.

तो अनुभव लक्षात असल्याने असे वाटले की हेही पळून जाईल, पण हे अस्वल हिमालयातले आणि आकाराने दुप्पट असावे. त्याची आणि माझी नजरानजर होताच ते ओरडले (डरकाळी फोडली). मग मीही हिंमत एकवटून त्याच्या डरकाळीला ओरडून प्रत्युत्तर दिले.

आता बाॅल मी अस्वलाच्या कोर्टात टाकला होता. आणि मी त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तयारी करून आत्मविश्वासाने उभा होतो. माझा हा आवेश पाहुन अस्वलही डगमगले  आणि  काय करावे हे न सुचल्याने वळणावर पुढे पळाले. ते कुठे पळाले हे पाहण्यासाठी मी वळणाच्या थोडे पुढे आलो.  अस्वल सुमारे ५० फुट पळाले होते व मी दिसताच पुन्हा माझ्या दिशेने आले.
माझ्या पासून दहा बारा फुट अंतर राखून मागच्या दोन्ही पायांवर क्षणभर थांबले. त्याची उंची साडेपाच फुटांच्या वर होती. मी मात्र निर्विकार पणे त्याच्या नजरेला नजर देऊन उभा होतो. परंतू, ते दरीच्या बाजुला पळाले आणि तेथील एका मोठ्या खडकांच्या मागे गेले.

माझ्या ठाम भुमिकेने अस्वलाला समजले की :

१) मी इतरांसारखा घाबरलो नाही.

२) आपणहून हल्ला करण्याचा माझा इरादा नाही.

३) पण हल्ला केल्यास जोरदार प्रत्युत्तर मिळेल.

असा विचार करून हा माझा सुमारे सहा फुटी उंचीचा (दोन पायांवर उभा असताना) मित्र, दरीच्या बाजूला उतरला. आता, खरंच तो दरीतच गेलाय कां ? हे पाहण्यासाठी मी थोडा पुढे गेलो.  मी पाहिले की ती एक मादी अस्वल होती आणि एका मोठ्या शिळेमागे गेली  होती.  तिचे एक पिल्लू एका उंच झाडामागून डोकावून आईकडे पहात होते. आईने बोलावताच ते पिल्लू शिळेमागे पळत गेले आणि ते दोघे मायलेक दरीमध्ये गायब झाले.

मित्रांनो, हे सर्व फक्त दीड मिनिटांत घडले. मी गळ्यात कॅमेरा असूनही अस्वलीचा फोटो काढण्याची हिंमत करु शकलो नाही, कारण मला तिची नखे (जी माझ्या बोटांच्या लांबीची होती) दिसत होती.  शिवाय आपण आणलेले अवसान हे उसने आहे,. हे माहीत होते. परंतू, ती दरीत उतरल्यावर, तिच्या पिल्लांचे काढलेले दोन फोटो या स्टोरीसोबत जोडत आहे.

यानंतर, दहा मिनिटात प्रथमसिंग आणि इतर सर्व आले. त्यांना "समग्र अस्वल स्टोरी" सांगितली. कोणाचीही विश्वास बसेना. प्रथमसिंग तर म्हणाला "क्या बात करते हो चाचा"? भालू बहोत खतरनाक होते है, यहाके सब लोग बाघसे ज्यादा, भालूसे डरते  है. आप भागे नहीं ये अच्छा कीया, वरना भालू आपको पकड लेता और????

मग मी त्यांना पिल्लांचे फोटो दाखवले. तेव्हा सर्व हबकून गेले. दोन गावकरी घोड्यावरून उत्तर काशीला चालले होते, त्यांना अस्वल दिसल्याचे कळताच घोडा मागे फिरवला, इतकी जनतेच्या मनात अस्वलाची  दहशत दिसली.

प्रसंग मोठा बाका होता पण आता धोका टळला होता.

टिप्पण्या